Lockdown : काय सांगता ! मार्च पाठोपाठ आता एप्रिल आणि मे महिन्याचा पगार नाही ?

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गामुळे जगभरातील विमानसेवा ठप्प आहे. यामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे नुकसान झालायं. तसेच अनेक कंपन्यांनी लॉकडाऊन काळात पगार न देण्याचे जाहीर केलं आहे. अशातच खासगी क्षेत्रातील कंपनी स्पाइस जेटने त्यांच्या वैमानिकांना पगार देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच या काळात ज्या वैमानिकांची कार्गो फ्लाइटसाठी ड्युटी लागली त्यांना ब्लॉक आवर फ्लॉनच्या हिशोबाने पैसे दिले जाणार असल्याचं सांगितलं.

याबाबत स्पाइस जेटचे चीफ फ्लाइट ऑपरेशन कॅप्टन गुरुचरण अरोडा यांनी सर्व वैमानिकांना
इ-मेल पाठवून माहिती दिली. या इ-मेल मुळे कंपनीतील सर्व वैमानिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. कंपनीने यापूर्वी मार्च महिन्यात देखील पगार दिला नव्हता. आता एप्रिल व मे महिन्यात देखील पगार मिळणार नसल्याने वैमानिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडणार आहे.

प्रिय, वैमानिक येत्या दोन महिन्यांसाठी म्हणजे एप्रिल आणि मे २०२० मध्ये तुमचा पगार दिला जाणार नाही. ज्या पायलटना कार्गो फ्लाइटसाठी ड्युटी लागली होती. त्यांना तासाच्या हिशोबाने पगार दिला जाईल, असे अरोडा यांनी पाठवलेल्या इ- मेल मध्ये म्हटलयं.

म्हणजे ज्या वैमानिकांना मालवाहतुकीसाठी कामावर बोलवलं गेलं त्यांनाच तासाच्या हिशोबाने पैसे दिले जातील. ब्लॉक आवर फ्लॉन म्हणजे वैमानिकाने किती वाजता विमानाचे चाक हलवले आणि किती वाजता विमानाचे चाक पुन्हा स्थिर केले ती वेळ होय. जर विमानाला दिल्लीतून कोलकत्ता कडे जाण्यासाठी दोन तासांचा वेळ लागत असेल तर तितक्या वेळेचे पैसे वैमानिकाला मिळतील. मात्र स्पाइस जेटने वैमानिकांना तासाच्या हिशोबात पैसे देणार असल्याचे सांगितले. पण ते किती असतील हे अद्याप त्यांनी सांगितलं नाही. यापूर्वी कंपनीने मार्च महिन्यात वैमानिकांना २५ ते ३१ तारखेपर्यंत विनापगार सुट्टी दिली होती.

देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार कपात करू नये किंवा त्यांना कामावरून काढून टाकू नये अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. परंतु त्यांनतर देखील देशातील काही कंपन्यांनी असे निर्णय घेतल्याचे दिसत आहे.