भय्यू महाराज प्रकरणी ड्रायव्हरचा खळबळजनक खुलासा, म्हणाला – ‘गाडीत लावलेली होती गुप्त यंत्रणा’

इंदौर : पोलीसनामा ऑनलाईन – अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात शुक्रवारी (दि. 12) महाराजांचा ड्रायव्हर आणि सेवेकरी कैलाश पाटील याची फेरचौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. महाराजांच्या गाडीवर जीपीआरएस ट्रॅकर लावलेले होते. गाडीच्या लोकेशनवर नजर ठेवली जायची. महाराजांची पत्नी आयुषी गाडीत त्यांच्यासोबत असलेल्या सेवेकऱ्यांना सतत फोन करून विचारायची, की सोबत कोण-कोण आहे, असे वक्तव्य करून त्याने खळबळ उडवून दिली आहे.

फिर्यादीच्या वकिलांनी शुक्रवारी (दि. 12) कैलाशचा दुसऱ्यांदा जबाब घेण्यासाठी त्याला बोलावण्याची मागणी केली. या प्रकरणात आता सोमवारी (दि.15) सुनावणी होणार असून या दिवशी महाराजांचा सेवेकरी शेखरलाही बोलावले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 25 पेक्षा अधिक साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्यात सुनावणी संपवण्याचा आदे दिल्याने सुनावणीला वेग आला आहे. यावेळी कैलाशने न्यायालयाला सांगितले की, आयुषी आणि कुहूमध्ये सतत भांडण होत असत. यामुळे महाराज तणावात होते. घटनेच्या तीन महिने आधी महाराजांनी मला कुहूची गाडी चालवण्यासाठी पुण्याला पाठवल्याचेही त्यांने न्यायालयाला सांगितले. तसेच कैलाशने प्रतिचौकशीत हे देखील सांगितले की, सानिया सिंह नावाची एक मॉडेल आणि अभिनेत्री महाराजांना भेटायला इंदौरला येत असे. तिच जेवण महाराजाकडून लपूनछपून पाठवल जायचे. फिर्यादीचे वकील गाजराजसिंह सोळंकी यांनी सांगितले की, दुसऱ्यांदा प्रतीचौकशी करताना कैलाशने ही गोष्ट कबुल केली की, त्याने पोलिस एमआयजीद्वारे कोठडीत ठेवल गेल्याची काहीच तक्रार केली नव्हती. आम्ही या साक्षीदाराची गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित कागदपत्र सादर करण्याची कोर्टाकडे मागणी केली असून पुढची सुनावणी 15 मार्च रोजी होणार आहे.