वेस्टइंडीजचा ‘हा’ खेळाडू होता सुरक्षारक्षक आता झाला ‘धडकी’ भरवणार गोलंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप सध्या इंग्लंडमध्ये सुरु असून सर्वच संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. या सगळ्यात इतर संघांच्या तुलनेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या विंडीजने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधात झालेला सामनाही त्यांनी अटीतटीचा केला. मात्र या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या सगळ्यात विंडीजच्या एका खेळाडूची फार चर्चा होताना दिसून येत आहे. विकेट घेतल्यानंतर त्याची जल्लोष करण्याच्या पद्धतीमुळे तो सध्या सोशल मीडियावर फार फेमस झाला आहे. त्या खेळाडूचे नाव आहे, शेल्डन कॉटरेल.

 

Sheldon-Cottrrel

फलंदाजांना सळो कि पळो करून सोडणाऱ्या या गोलंदाजाच्या समोर भले भले फलंदाज आपली नांगी टाकतात. बाउन्सर तसेच यॉर्करने तो फलंदाजांना जेरीस आणतो. विकेट घेतल्यानंतर तो सॅल्यूट ठोकत आपला आनंद व्यक्त करत असतो. त्याच्या या पद्धतीचे समालोचक देखील कौतुक करत असतात.

मात्र त्याच्या या स्टाईलमागचे एक कारण आहे, आणि ते म्हणजे तो स्वत: काही वर्ष सुरक्षादलात होता. २०११ मध्ये वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात मैदानावर सुरक्षा देण्याच काम कॉटरेल करत होता. त्यामुळे विकेट घेतल्यानंतर तो अशा प्रकारे आनंद व्यक्त करतो. २०१३ साली त्याने भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. मात्र प्रदर्शनामुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले होते. त्याचे लष्करच्या वेशातील काही फोटो व्हायरल झाल्याने सध्या तो चर्चेत आला आहे.