Coronavirus Impact : ‘ही’ अट मान्य असेल तरच IPL खेळवा, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा BCCI ला ‘धक्का’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात दहशत माजवली आहे. या व्हायरसचा फटका अनेक उद्योगधंद्यांना बसत असताना आता याचा फटका क्रिडा जगताला देखील बसण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर असतानाच इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2020) आणि देशात होणाऱ्या अन्य महत्त्वाच्या स्पर्धांबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) देशातील सर्व राष्ट्रीय क्रीडा संघटनांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी स्पर्धा घेताना त्या बंद स्टेडियमवर म्हणजेच प्रेक्षकांविनाच घ्या असे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा ही बंद दरवाजात होईल. बीसीसीआयकडून अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना केंद्रीय क्रीडा मंत्री सचिन राधेश्याम जुलानिया यांनी सांगितले की, जर एखादी स्पर्धा प्रेक्षकांविना खेळवता येत असेल तरच त्याचे आयोजन करा. तेथे अधिकाधिक लोकं जमणार नाही याची काळजी घ्या. बीसीसीआय योग्य ती काळजी घेईल, असे BCCI च्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. त्यांनी सांगितले की, खेळाच्या, खेळाडूंच्या, चाहत्यांच्या आणि लीगच्या दृष्टीनं योग्य तो निर्णय घेतला जाईल. सध्याच्या परिस्थितीवर बीसीसीआयचे नियंत्रण नाही.