चिकन खाल्ल्यामुळं कोरोना व्हायरसचा प्रसार ?, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दूर केल्या सर्व ‘शंका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरूच असून या आजाराने जगभरात दहशत निर्माण केली आहे. चीनमध्ये मृतांची संख्या आणि संसर्ग झालेल्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान, जगातील तब्बल 31 देशात कोरोना व्हायरसने शिरकाव केला असला तरी त्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. मात्र, कोरोना व्हायरसची दहशत आणि भिती निर्माण झाल्याने विविध प्रकारच्या अफवा पसरत आहेत. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस पसरतो अशी अफवा पसरल्याने भितीने काही लोकांनी चिकन खाण्याचे सोडले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसमुळे अलर्ट घोषित केला असून यामध्ये अंडे किंवा चिकन खाण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे शिजवण्याची सूचना केली होती. यामुळेही अंडी आणि चिकन खाण्यासाठी काही प्रमाणात शंका व्यक्त केली जात आहे. चीनमधून कोरोना व्हायरसबाबत अनेक वृत्त दिवसभरात येऊन थडकत असल्याने लोकांनी धसका घेतला आहे.

देशभरात चिकनचा खप घसरला
माध्यमांच्या वृत्तानुसार चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रकोप सुरू असल्याने त्याचा भारतातही परिणाम दिसून येत आहे. लोक दक्षता बाळगत असल्याने तसेच घाबरून चिकन, अंडी खाणे बंद करत आहेत. यामुळे भारतात चिकनचा खप कमी झाला आहे. भारतात 10 ते 15 टक्के चिकनची मागणी कमी झाली आहे. यापूर्वीदेखील चीनमधील सार्स व्हायरसच्या भितीने भारतात चिकनच्या मागणीत घट झाली होती. यावेळेस सुद्धा खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. मात्र, हे प्रमाण सध्या तरी कमी आहे.

माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनाच्या भितीने चिकनची मागणी कमी झाल्याने चिकनचे दर किलोमागे 100 रूपयांनी घटले आहेत. दिल्लीत चिकनचे दर 72 रूपये प्रतिकिलो झाले आहेत. पुण्यात चिकनचा दर 65 रूपये किलो झाला आहे. अंड्याच्या दरातही घसरण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोना व्हायरसबाबत वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार सध्या तरी हा व्हायरस एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरत आहे. तसेच चिकनमध्ये अद्याप विषाणूचा संसर्ग आढळलेला नसल्याने चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.