हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जम्मू काश्मीरमधील बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र निनाद मांडवगणे हा शहीद झाला आहे.

स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) हे शहरातील डीजीपीनगर एक मधील श्री साईस्वप्न को-आपरेटिव्ह हॉसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडिया कॉलनीतील बारा क्रमांकाच्या बंगल्यात मांडवगणे कुटुंबिय राहतात. त्यांच्या मागे पत्नी लखनऊच्या विजेता, दोन वर्षाची कन्या, बँकेतून निवृत्त झालेले वडील अनिल, आई सुषमा, जर्मनीतील धाकटा बंधू असा परिवार आहे.

निनाद यांचा जन्म १९८६ मध्ये झाला असून त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी पूर्व संस्थेतून पूर्ण केले. ते २६ व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये (एनडीए) झाली. हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर २४ डिसेंबर २००९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले. २४ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक होती. निनाद यांच्या आई बँक ऑफ इंडियामधून, तर वडील सिंडीकेट बँकेतून निवृत्त झाले आहेत. कौटुंबिक कारणास्तव ते लखनऊला गेले आहेत. गुरुवारी रात्री ते परत नाशिकला येणार आहेत. भारतमातेच्या प्रेमाने भारावून गेलेले कुटुंबातील सदस्य सोडून गेल्याने मांडवगणे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मोठ्या कामगिरीची दिली नाही कल्पना

निनाद यांच्या वडिलांना मंगळवारी सायंकाळीच भ्रमणध्वनी आला होता. त्यावेळी त्याने नेहमीप्रमाणेच विचारपूस केली. असेही तो कुठेही असला तरी, दरररोज न चुकता सकाळी किंवा सायंकाळी फोनवरून बोलत असे. मंगळवारी सायंकाळी त्याला कोठे आहेस असे विचारले तेव्हा त्याने श्रीनगरला एवढ्या एका शब्दात उत्तर दिले अशी माहिती त्याचे वडील अनिल मांडवगणे यांनी दिली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत-पाक तणावाबाबत मात्र तो चकार शब्दही बोलला नाही. अगदी मंगळवारी सकाळी त्याला विशेष मोहिमेवर पाठविण्यात येणार आहे, याची साधी कल्पनाही त्याने दिली नाही.

मांडवगणे कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक सारेच नाशिकचे असल्यामुळे निनाद यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे त्यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ?