ईस्टर संडेला श्रीलंकेत ३ चर्च, ३ हॉटेलमध्ये साखळी बॉम्बस्फोट ; २५ ठार तर २०० जखमी

कोलंबो : वृत्तसंस्था – कोलंबो येथे झालेल्या तब्बल सहा साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंका हादरली आहे. ऐन इस्टर संडेच्या दिवशी तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. सकाळी ८. ४५ वाजता झालेल्या बॉम्बस्फोटात अद्याप २५ जण ठार तर २०० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली आहे.

ईस्टर संडेच्या वेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना हा बॉम्बस्फोट घडवून आणल्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , जेव्हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला त्यावेळी ईस्टर संडेच्या निमित्ताने चर्चमध्ये प्रार्थना आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक चर्चमध्ये जमा झाले होते आणि याच वेळेला हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरित कोलंबो नॅशनल हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा बॉम्बस्फोट नक्की कोणी घडवला याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही.