श्रीलंकेत मुस्लीमविरोधी दंगली उसळल्या, देशभरात कर्फ्यू लागू

कोलंबो : वृत्तसंस्था – श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाने संपूर्ण श्रीलंका हादरून गेली. यानंतर सुरक्षादलांनी कट्टरपंथी यांच्याविरुद्ध व्यापक कारवाई हाती घेतली असतानाच देशाच्या विविध भागात मुस्लीमविरोधी दंगली उसळल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण श्रीलंकेत आजपासून रात्रीच्यावेळी आठ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोच्या उत्तरेकडील अनेक भागात दंगली उसळल्या आहेत. ख्रिश्चनांच्या जमावाकडून मुस्लीम व्यापाऱ्यांवर हल्ला तसेच काही मशिदींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. त्यानंतर आधी तीन जिल्ह्यांमध्ये आणि आता देशभरात रात्री आठ तासांची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय श्रीलंका सरकारने घेतला आहे.

श्रीलंकेत बहुसंख्यक सिंहली समुदाय आणि अल्पसंख्यक मुस्लीम धर्मीय यांच्या संघर्ष उसळला आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्रीलंका सरकारने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.

२१ एप्रिल रोजी ईस्टर संडेचा दिवस निवडून दहशतवाद्यांनी तीन चर्च तसेच तीन तारांकित हॉटेलांमध्ये बॉम्बस्फोट घडवले होते. या आत्मघाती हल्ल्यात २५३ जणांचा बळी गेला होता तर ५ हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर देशभरात प्रक्षुब्ध भावना असून त्याचेच पडसाद उमटताना दिसत आहेत.