श्रीलंकेतील हल्ल्याचे न्यूझीलंड हल्ल्याशी कनेक्शन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रविवारी २१ तारखेला ऐन इस्टर संडे दिवशी श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरली. श्रीलंकेत या दिवशी तब्बल ८ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले.

यात आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला नेमका कशामुळे करण्यात आला याबाबत आता एका नवी माहिती समोर आली आहे. या दहशतवादी हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ या कुख्यात कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी एका माथेफिरूने फेसबुक लाईव्ह करीत ख्राईस्टचर्च भागातील मशिदीत अंदाधुंद गोळीबार केला होता. यात ५० लोक मृत्युमुखी पावले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठीच श्रीलंकेत स्फोट घडवून आणण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती श्रीलंकेचे उपसंरक्षणमंत्री रुवान विजेवार्देन यांनी तेथील संसदेला माहिती देण्यासाठी केलेल्या भाषणांमध्ये सांगत खुलासा केला आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी या स्फोटांमागे ज्या दहशतवाद्यांचा हात आहे त्यांना शोधून काढण्यासाठी इतर देशांकडून सहकार्य मागितले आहे. स्फोटांचा कट रचण्यापासून ते घडवून आणण्यापर्यंत विदेशी दहशतवाद्यांनी मदत केली असावी असा दाट संशय आहे. हे दहशतवादी शोधून काढण्यासाठी इतर देशांकडून सहकार्य मागण्यात आले आहे.

‘नॅशनल तौहीद जमात’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्यांना बाहेरून मदत मिळाल्याशिवाय ते इतके मोठे हल्ले करूच शकत नाही असं श्रीलंकेच्या आरोग्यमंत्री रजिथा सेनारत्ने यांनी म्हटले आहे.