हिंगोलीत वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जवानाची आत्महत्या ?

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाने आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला असुन जवानाने वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा आरोप जवानाच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी जवानाच्या मोठया भावाने वरिष्ठांविरूध्द बाळापूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार देखील केली आहे.

विष्णू मंदाडे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी गावचे होते. सन 2014 मध्ये ते सेवेत रूजु झाले होते. अतिशय प्रामाणिक असलेले विष्णु हे वेळावेळी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करीत होते. त्यामुळे त्यांना वेळावेळी दूरदूर पर्यंत बंदोबस्तासाठी जावे लागत होते. जवळपास बंदोबस्त डयुटी हवी असल्यास त्यांना वरिष्ठांना पैसे द्यावे लागत होते असे त्यांनी कुटुंबियांना सांगितले होते. सध्या त्यांनी रजा घेतली होती. सुट्टीवर घरी येण्यापुर्वी मंदाडे आणि त्यांच्या वरिष्ठांचे खटके उडाले होते. त्याच रागातुन त्यांनी गळफास घेवुन आत्महत्या केली असा आरोप देखील मंदाडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

मंदाडे यांच्या मोठया भावाने वरिष्ठांविरूध्द पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंदाडे यांना खरच वरिष्ठांकडून त्रास होत होता का याबाबत माहिती घेण्याचे काम चालु असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, याप्रकरणावर राज्य राखीव दलातील वरिष्ठ बोलण्यास तयार नाहीत.