हिंगोलीत कोल्हापुरातील SRPF जवानाची आत्महत्या

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – हिंगोलीमध्ये राज्य राखीव दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (दि.29) पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुनिल भीमराव जाधव (वय-35, रा. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. आज पहाटे सुनिल यांची पत्नी झोपेतून उठल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले.

सुनिल जाधव हे राज्य राखीव दलाच्या वसाहतीमध्ये पत्नी व लहान मुलीसोबत राहतात. आज पहाटे त्यांच्या पत्नीला जाग आल्यानंतर त्यांना सुनिल यांनी हॉलमधील पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. या घटनेची माहिती राज्य राखीव दलाच्या अधिकाऱ्यांना समजताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती हिंगोली पोलिसांना देण्यात आली.

सुनिल जाधव हे मुळचे कोल्हापूरचे रहिवासी असून ते राज्य राखीव दलाच्या भरतीमध्ये 2006 मध्ये भरती झाले होते. त्यांनी हिंगोलीच्या नक्षलग्रस्त भागात तसेच देशातील विविध राज्यामध्ये निवडणुकांमध्ये बंदोबस्ताचे कर्तव्य पार पाडले आहे. राखीव दलातीत मनमिळावु जवान म्हणून सुनिल जाधव यांची ओळख होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. जाधव यांच्या आत्महत्येमुळे राज्य राखीव दलात खळबळ उडाली आहे. पुढील तपास हिंगोली पोलीस करीत आहेत.