सलग दुसऱ्या दिवशी महसूल प्रशासनाचे कामकाज ठप्प, सामान्य नागरिकांची गैरसोय

नेवासा (जि. नगर) : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या तत्वतः मंजूर होऊन ही अद्याप शासन निर्णय काढले जात नसल्याने राज्य महसूल कर्मचारी संघटनेने गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. आज दुसऱ्या दिवशीही महसूल विभागाचे संपूर्ण कामकाज ठप्प असल्याने सामान्य नागरिकांची मोठी गैरसाेय होत आहे.

या संपात सहभागी होऊन नेवासा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारीपासून तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. या संपामध्ये प्रमुख मागण्या मान्य होईपर्यत संप सुरू राहणार असल्याचे सांगितले जाते आहे. या संपात नायब तहसीलदार खालील पदावरील सर्व कर्मचारी संपावर आहेत.

नायब तहसीलदार पदाचा ग्रेड पे वाढवावा, लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहायक करावे, नायब तहसिलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करावे, अव्वल कारकून वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातील तलाठी संवर्गात पदोनत्ती देणे, आकृतीबंधात सुधारणा करण्याबाबत सादर केलेल्या अहवालानुसार पदे मंजूर करणे, इतर विभागाच्या कामांसाठी नवीन आकृती बंध करावा, लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नायब तहसिलदार, तहसीलदार व उपजिल्हाधिकारी पदासाठी गृह विभागाच्या धर्तीवर महसूल कर्मचाऱ्यांसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात आदी मागण्या शासनाकडून तत्त्वतः मान्य व्हावा यासाठी सलग दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प पडल्याने रेशन कार्ड , फेरफार, विविध प्रकारचे दाखले काढण्यास विलंब होत आहे.

या ठिय्या आंदोलनात नायब तहसिलदार संजय परदेशी, नायब तहसिलदार नारायण कोरडे, मिलिंद नवगिरे, उत्तम रासकर अतुल भांगे, सतीश क्षेत्रे, राजेंद्र वाघमारे, विजय नैमाणे, आनंद दुशिंगे, पांडुरंग नन्नवरे, ओम खूपसे, अशोक कायगुडे, रंजना वाघमारे, सुशीला खोमणे, रतन पवार, ज्ञानेश्वर रक्ताटे, संतोष लहारे, संतोष बारशे, रमेश माळी, रावसाहेब आरगडे, बंडू सोनवणे संपात सहभागी झाले होते.