दहावीची परीक्षा शक्य ? धनंजय कुलकर्णीनी शिक्षणमंत्र्यांसमोर सादर केला प्रस्ताव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा सरकारकडून विचार केला जात आहे. त्या विरोधात उच्च न्यायालयात धनंजय कुलकर्णी यांनी याचिका दाखल केली आहे. कुलकर्णी यांनी दहावीची परीक्षा कशा घेऊ शकतो याबाबतचा प्रस्ताव शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमोर सादर केला आहे. त्यामध्ये कोरोना प्रतिबंधित नियमांचे पालन करून परीक्षांचे नियोजन शाळास्तरावर आणि २ सत्रांत केल्यास हे शक्य होऊ शकते, असे त्यांनी म्हंटले आहे.

शाळेतील दहावीतील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे त्यावर त्यांची सकाळ आणि दुपार अशा दोन गटांत विभागणी करून परीक्षा घेतल्यास, १५ दिवसांत परीक्षा पार पाडली जाऊ शकते. त्याचबरोबर परीक्षा केंद्रांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था, निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास शाळांकडून आवश्यक ती खबरदारी जबाबदारी म्हणून नक्कीच पार पाडली जाईल. विशेष सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परीक्षेसाठी उपलब्ध करून दिली जाऊ शकते. शाळेमध्ये परीक्षार्थी, संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांनाच प्रवेश दिला जावा. याबाबत नियोजन केल्यास परीक्षा व्यवस्थित पार पडू शकतात. दरम्यान, यामध्ये एकाच दिवसाच्या दोन सत्रांसाठी दोन विविध प्रश्नसंचांचा भार राज्य परीक्षा मंडळाला उचलावा लागू शकतो.असेही त्यांनी म्हंटले आहे.

मूल्यांकन शाळास्तरावर केल्यास प्रश्न सुटेल
मूल्यांकनाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यावरही कुलकर्णी यांनी प्रस्तावात मार्ग काढला आहे. यंदा शाळेतील उत्तरपत्रिकांचे शाळेतच मूल्यांकन केल्यास मूल्यांकनाचा प्रश्नही सुटू शकेल. तसेच संगणकीय व्यवस्थेद्वारे केवळ सगळे गुण शिक्षण मंडळाकडे पोहोचवल्यास शिक्षकांनाही त्रास होणार नाही. अशा प्रकारे मूल्यांकन केल्यास १५ दिवसात निकाल लागेल. एवढेच नाही तर ऑगस्टपासून अकरावी प्रवेशप्रक्रियाही सुरू करता येईल, असेही कुलकर्णी यांनी या प्रस्तावात म्हंटले आहे.