10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! आता परीक्षेला अर्धा तास अधिक वेळ मिळणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे परीक्षा आता 3 ऐवजी साडे तीन तासांची असणार आहे. गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असल्याने त्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांना अर्ध्या तासाचा वेळ वाढवून दिल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी (दि. 20) दिली. तसेच परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच एखाद्या विद्यार्थ्यामध्ये कोरोनाची लक्षण आढळली आणि त्याला परीक्षा देता आली नाही तर अशा विद्यार्थ्यांची जून महिन्यात विशेष परीक्षा घेतली जाणार असल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा येत्या एप्रिल अखेर पासून सुरू होणार आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परीक्षा ऑनलाइन होणार का अशी चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे. राज्याची भौगोलिक स्थिती पाहता परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहेत, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा केंद्र राहील असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीटाच्या आधारे विद्यार्थी आणि पालकांना लोकलमध्ये मुभा दिली जाईल. कोरोना काळ असल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षेत पास होण्याचे निकष बदलले जातील अशी चर्चा होती. मात्र ही शक्यता शिक्षणमंत्री गायकवाड यांनी फेटाळली आहे. पासिंग गुणांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.