10 वी चा निकाल 18 टक्क्यांनी वाढला, जाणून घ्या कसा ‘वाढला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शिक्षण मंडळाने मार्च 2020 मध्ये घेतलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर केला. ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा निकाल 18.20 टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींचा निकाल जास्त लागला असून मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून कोकण विभागाचा निकाल 98.77 टक्के लागला आहे. राज्यात सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा लागला आहे. औरंगाबाद विभागाचा 92 टक्के निकाल लागला आहे.

यंदाच्या वर्षी दहावीचा निकाल थेट 18 टक्क्यांनी वाढला आहे. हा निकाल वाढण्यामागचं नेमकं कारण समोर आलं आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर्षी दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर रद्द करण्यात आला. मुलांना त्या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले. तसेच अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षीचा निकाल 18 टक्क्यांनी जास्त लागला आहे. राज्यात केवळ टक्के मुलं नापास झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभीगीय मंडळामार्फत 3 ते 22 मार्च या दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली. याच दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेवटचा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचार बंदीमुळे दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या व विभागीय मंडळाकडे जमा करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. यामुळे दहावीचा निकाल लागण्यास विलंब लागला. लॉकडाऊन काळात देखील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांनी निकाल तयार करण्याचे काम सुरु ठेवल्यामुळे 29 जुलैला निकाल जाहीर करणे शक्य झाले.