सोलापूर-वैराग रस्त्यावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर – वैराग रस्त्यावर राळेरास शेळगाव जवळ एसटी बस आणि जीपचा भीषण अपघात झाला असून ४ जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर ५ ते ६ लोक गंभीर जखमी झाले आहेत. बस ही सोलापूरकडे जात होती . शेळगावजवळ बस येताच जीपसोबत जोरदार टक्कर झाली. या धडकेत जीपचा चुराडा झाला आहे. जीपमध्ये पंचायत समितीचे कर्मचारी होते, त्यातील ४ जणांचा मृत्यू झाला असून ,५ ते ६ जण गंभीर जखमी आहेत.

हा अपघात रस्त्यामुळे झाला असल्याचे बोलले जात आहे , कारण रस्ता अतिशय नित्कृष्ट दर्जाचा असून , त्याच्या दुरुस्तीसाठी कायम आंदोलने होत असतात. त्या संदर्भात निवेदन देऊन सुद्धा रस्ता अजून दुरुस्त झाला नसून , अजून किती लोकांचा जीव गेल्यावर रस्ता दुरुस्त करण्याची जाग प्रशासनाला येणार आहे असा प्रश्न सामाजिक संघटनांनी विचारला आहे.

दुसरा अपघात
नंदुरबारजवळ झालेल्या अन्य एका अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला आहे. सात पायरी घाटातील नागार्जुन मंदिराजवळ बोलेरो गाडी ३० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. यामध्ये २ जण मृत्युमुखी तर ८ ते १० गंभीर जखमी झाले आहेत, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून जखमींवर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले आहे.

You might also like