आजपासून ‘लालपरी’ सुसाट धावणार, ठिकठिकाणी फटाके फोडून ‘स्वागत’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील गोरगरिबांची लाईफलाइन समजली जाणारी लालपरी अर्थात एसटी बस अखेर आजपासून सुरू झाली आहे. कोरोनामुळे तब्बल पाच महिन्यांपासून बंद असलेल्या सेवेला जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखाविला. त्यामुळे आज सकाळपासून एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी  फटाके फोडून लालपरीचे स्वागत केले.

शहरातील मध्यवर्ती स्वारगेट बस स्थानकातून पहिली आंतरजिल्हा बस सकाळी साडेआठला सुटली. तब्बल पाच महिन्यानंतर एसटीची आंतरजिल्हा बस सेवा सुरू झाली. स्वारगेट ते बोरीवली अशी ही बस आहे. कोकण, सोलापूर, कोल्हापूरलाही स्वारगेटवरून गाड्या सुटल्या आहे. स्वारगेट बस स्थानकातून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मोठ्या दिमाखात ही शिवशाही आता कोल्हापूरकडे निघाली आहे.

तर सोलापुरातून पहिली एसटी बसही पुण्याला रवाना झाली आहे. सोलापूर शहरातील एसटी बसस्थानकातून सकाळी ही बस पुण्याच्या दिशेने रवाना झाली. या बसला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. एवढंच नाहीतर फटाके फोडून बसचे स्वागत केले आहे. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. लॉकडाउननंतर एकदा एसटी बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. पण प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने एसटीने सेवा बंद केली.