UPSC परीक्षार्थीच्या नियोजनाबाबत एसटी विभाग संभ्रमात

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे 4 ऑक्टोबरला सिव्हिल सर्व्हिसेस (पूर्व) परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मुंबईच्या 38 उपकेंद्रात विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातून एसटीचे नियोजन करण्याची सूचना महामंडळाने सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना केली आहे. परंतु नागपुरात केंद्र असतानाही काही सूचना नसल्याने एसटीचे अधिकारीच संभ्रमात आहेत.

यूपीएससी परीक्षेसाठी मुंबईत 38 उपकेंद्रांसह नवी मुंबई आणि नागपुरातही उपकेंद्र राहणार आहे. मुंबईच्या उपकेंद्रात राज्याच्या विविध भागातून परीक्षार्थी येणार असल्याचे सांगत एसटी महामंडळाने राज्यातील प्रत्येक विभाग नियंत्रक कार्यालयांना परीक्षार्थीसाठी बसचे नियोजन करण्याची सूचना केली आहे. परंतु नागपूर केंद्रात परीक्षेला येणार्‍यांसाठी महामंडळाने काहीही स्पष्ट केले नाही. मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रावरून आदेश काढल्याचा संदर्भ पत्रात नमूद आहे. त्यामुळे येथील प्रशासनाने परीक्षार्थीच्या सोयीसाठी एसटीला सूचना दिली की नाही, हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. मुंबई केंद्रात जाणार्‍या परीक्षार्थीसाठी बस फेर्‍यांचे नियोजन करण्याचे आदेश मिळाले आहे. नागपुरातूनही आरक्षण उपलब्ध करण्याची तयारी आहे. नागपूर केंद्राबाबत आदेशात काहीच नमूद नसल्याचे विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले.