ST चालकाची स्मशानभूमित आत्महत्या, चिठ्ठीत लिहलं धक्कादायक कारण…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – माण तालुक्यातील दहिवडी शहरात एसटी चालकाने स्मशानभूमीतील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काशीनाथ अनंतराव वसव असे आत्महत्या करणाऱ्या चालकाचे नाव आहे. वसव हे दहिवडी आगारामध्ये कार्यरत असून आज पहाटे माण नदीपात्रानजीक असलेल्या स्मशानभूमीत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांना काशीनाथ वसव यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. दरम्यान, स्मशानभूमीतील शेडमध्ये एक व्यक्ती लटकत असल्याचे नागरिकांनी पाहिले. त्यावेळी त्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. त्यामुळे नागरिकांनी दहिवडी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ओळख पटवली. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून झडती घेतली. त्यावेळी वसव यांच्या खिशात चिठ्ठी सापडली.

काशिनाथ वसव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये, महागाई वाढली असून शासन पगार कमी देत आहे, वरिष्ठ अधिकारी त्रास देत आहेत, सरकार व महामंडळ लक्ष देत नाही. आत्महत्येशिवाय नोकरदारांना पर्याय नाही, असा मजकूर वसव यांनी चिठ्ठीत लिहिला आहे. वसव हे 20 वर्षापासून दहिवडी आगारात कार्यरत होते. काशिनाथ यांचा मुलगा आणि सून पोलीस दलात नोकरीस आहेत.

Visit : Policenama.com