एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आचारसंहितेच्या कात्रीत

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

राज्यातील लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना १ मे रोजी वेतनवाढ मिळण्याची घोषणा करण्यात येणार होती. परंतु ही वेतनवाढ आचारसंहितेच्या कात्रीत सापडली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निर्णय जाहीर केला जाईल, असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर दोन दिवसातच निवडणूक आयोगाने राज्यातील लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकांसाठी 02 जून 2018 अखेर आदर्श आचारसंहिता जाहीर केली. ही आचारसंहिता राज्यातील 35 पैकी 28 जिल्ह्यांना लागू झाली. या काळात कोणत्याही प्रकारची घोषणा करता येत नाही.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं वचन पाळण्याची तीव्र इच्छा असूनही आचारसंहितेमुळे काही काळ थांबावे लागणार असल्याचे एसटी प्रशासनाने म्हटले आहे. वेतनवाढीसाठी 1 मे, 2018 पर्यंत केलेली प्रतीक्षा नाईलाजाने काही काळ वाढवावी लागणार आहे. तरी कामगारांनी वेतन वाढी संदर्भात निश्चिंत रहावे, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.