एसटी कर्मचार्‍यांसाठी मोठा दिलासा ! गुरूवारपर्यंत मिळणार एक महिन्याचे वेतन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  गेल्या काही महिन्यांचा एसटीच्या लाखो कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार गुरुवारपर्यंत (८ऑक्टोबर) त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. उर्वरित वेतन लवकरच कर्मचाऱ्यांना अदा केले जाईल, असे परब यांनी म्हटले.

अगोदरच एसटी महामंडळ तोट्यात होते. त्यात कोरोना मुळे करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात अत्यावश्यक सेवा सोडली तर एसटी वाहतूक पूर्ण बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळ अजून तोट्यात गेले. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर २० ऑगस्टपासून ५० टक्के क्षमेतेने एसटी सुरु झाली. त्यानंतर १७ सप्टेंबरपासून १०० टक्के क्षमेतेने एसटी वाहतूक सुरु झाली. तथापि, जून पर्यंत चे वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, जुलै महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. तसेच कर्मचारी संघटनांनी आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान, परिवहनमंत्री परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत पुढील सहा महिन्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन इतर अनुषंगिक खर्चासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार अजित पवार यांनी तात्काळ १५० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. त्यासंबंधी शासन निर्णय निगर्मित करण्यात आला असून, त्यातून कर्मचाऱ्यांचे किमान एक महिन्यांचे वेतन महामंडळाला देणे शक्य होणार आहे.