भविष्यवाणी ! देशात स्थिर सरकार येणार अन् ‘राजा’ कायम राहणार ; शेतकऱ्यांची चिंता वाढणार

यंदा कमी पावसाची शक्यता.

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळची घटमांडणी बुधवारी सकाळी पार पडली. यामध्ये घटमांडणी केली गेली. तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे राजकीय भविष्यवाणीमध्ये राजाची गादी आणि राजा कायम असून पुन्हा एकदा देशाला स्थिर सरकार येण्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.  मात्र, शेतकऱ्यांसाठी भविष्यवाणी चिंताजनक आहे. अशा प्रकारे एकंदर आजची भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तविली आहे.

ही भविष्यवाणी ऐकण्यासाठी लोकप्रतिनिधीसह पंचक्रोशीतून हजारो शेतकरी पहाटेपासून येथे उपस्थित होते. या भविष्यवाणीत नैसर्गिक संकटाची सरबत्ती, पाऊस कमी तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकऱ्यांना यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले. पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. सार्वत्रिक प्रेरणा या महिन्यात होणार नाहीत. जुलैमध्ये चांगला पाऊस येईल. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये पाऊस कमी होईल.

अंबाळी, मोघम, रोगराई नाही. कापूस मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल. ज्वारी पिक सर्वसाधारण येईल. भावात तेजी राहणार नाही. गहू पीक मोघम स्वरुपाचे राहिल. तांदुळ मोघम होईल. तूर पीक चांगले राहिल. मूग, तीळ मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल, असे संकेत देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य. चारा-पाण्याची टंचाई येईल.

परकीय घुसखोरी होत राहणार असून भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल. तसेच आर्थिक व्यवस्थेचे प्रतीक असलेली करंजी फुटलेली आहे. म्हणजेच अर्थव्यवस्था डगमगेल. आर्थिक ताण देशावर येईल, अशी भविष्यवाणी वर्तविण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like