सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कुणाल कामरानं मांडली भूमिका ! म्हणाला, ‘ना वकील, ना माफी, ना दंड…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) अवमान केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) विरोधात खटला दाखल होणार अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल (K. K. Venugopal, Attorney General of India) यांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता कुणालनं त्याची बाजू मांडली आहे. उपहासात्मक टीका करत त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे. ना वकील, ना माफी, ना दंड असं तो या पोस्टमधून म्हणाला आहे.

काय म्हणाला कुणाल कामरा ?

कुणालनं ट्विट करत त्याचं म्हणणं मांडलं आहे. तो म्हणाला की, मी केलेले ट्विट्स सुप्रीम कोर्टाचा अपमान करत असल्याचं आढळलं आहे. मी जे ट्विट केलं होतं ते माझं सुप्रीम कोर्टानं प्राईम टाईम लाउडस्पीकरविरोधात दिलेल्या एकतर्फी निर्णयावरील मत होतं. मी माफी मागणार नाही. इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं बाळगलेलं मौन टीका न करता दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही, असंही तो म्हणाला आहे.

त्यानं म्हटलं आहे की, माझ्यावरील खटल्याचा वेळ, माझ्याइतकं महत्त्व आणि संधी न मिळालेल्या इतर महत्त्वाच्या प्रकरणांना द्यावा. काही प्रकरणांचा त्यानं उल्लेखही केला आहे. माझी वेळ इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना दिली तर आभाळ कोसळेल का असा सवालही त्यानं केला आहे.

सुप्रीम कोर्टानं अद्यापही माझ्या ट्विट संबंधित काही जाहीर केलेलं नाही. पण जेव्हा कधी करतील तेव्हा ते हसतील अशी आशाही कुणानं यावेळी व्यक्त केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर ट्विट करताना स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं न्या. चंद्रचूड आणि सुप्रीम कोर्टाबाबत नाराजी व्यक्त केली. या संदर्भात कुणालनं काही ट्विट्सही केले. यानंतर पुण्यातल्या काही वकिलांनी अ‍ॅटर्नी जनरल यांच्याकडे तक्रार केली. यानंतर कुणाल विरोधात खटला दाखल करण्याचे आदेश अ‍ॅटर्नी जनरल यांनी दिले.

एका ट्विटमध्ये कुणालनं सुप्रीम कोर्टात महत्मा गांधींऐवजी हरिश साळवे यांचा फोटो लावावा, अशी मागणी केल्याची आठवण करून देत पंडित जवाहरलाल नेहरूंऐवजी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी केली आहे.