शिवप्रेमींचा संताप पाहिल्यानंतर अग्रीमा जोशुआनं मागितली लेखी माफी ! ‘तो’ वादग्रस्त व्हिडीओ देखील केला Delete

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कॉमेडीयन अग्रीमा जोशुआ हिनं महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची स्टँडअप कॉमेडी शोमध्ये थट्टा केली होती. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. यानंतर अनेक शिवप्रेमींनी आणि राजकीय मंडळींनी अग्रीमावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर आता अग्रीमा जोशुआनं ट्विटरद्वारे जाहीर माफी मागितली होती.

अग्रीमानं सादर केला लेखी माफीनामा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. मनसेचे कार्यकर्ते एन रानडे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. मनसे दणका दिल्यानंतर अग्रीमानं लेखी माफीनामा सादर केला आहे. अग्रीमानं तिच्या ट्विटर अकाऊंटवरूनही जाहीर माफी मागितली आहे. महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडीओदेखील हटवण्यात आला आहे.

अग्रीमानं ट्विट करत मागितली माफी

अग्रिमा जोशुआ आपल्या ट्विटमध्ये म्हणते, थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तांची मनं दुखावल्यानं मी त्यांची मनापासून माफी मागते. तसंच तो व्हिडीओ हटवण्यात आला आहे.” असंही तिनं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेनं केली होती अग्रीमाच्या अटकेची मागणी

अग्रीमा जोशुआचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रताप सरनाईक (शिवसेना नेते) यांनी अग्रीमाला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती. प्रताप सरनाईक म्हणाले होते की, “अग्रीमानं शिवरायांच्या पुतळ्याचं विडंबन करून कॉमेडी केली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला शिवरायांबद्दल आदर नाहीये किंवा माहिती नाहीये हे लक्षात येत आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कोणी करत असेल तर ते अयोग्य आहे. यासाठी मी गृहमंत्र्याना पत्र लिहून अग्रीमा जोशुला अटक करण्याची मागणी केली आहे.”

पैसे कमावण्यासाठी जर महाराजांचा वापर करत असशील तर महिला आघाडी आणि युवसेना जाब विाचरल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये महाराष्ट्रातील जनता आणि शिवभक्त खपवून घेणार नाही असा इशाराही आमदार सरनाईक यांनी दिला होता.

काय म्हणाली होती अग्रीमा जोशुआ ?

अग्रीमा स्टँडअप कॉमेडी शोमध्ये म्हणाली होती की, “शिवाजी पुतळ्यासंदर्भात मी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर सर्च केलं. मला कोणीतरी लिहिलेला भला मोठा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्री मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्टर स्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्रात त्यांची सत्ता येईल. तर दुसऱ्या एकाला वाटलं की, क्रिएटीव्हिटी कॉन्सेंट आहे. त्यानं लिहिलं की, यात जीपीएस ट्रॅकरही असणार. शिवाय त्यांच्या डोळ्यातून लेजर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसऱ्या एका व्यक्तीनं शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा असं लिहिलं होतं… बस्स मी त्यालाच फॉलो केलं”