Pune : शहरात साठलेला कचरा उचलण्यास सुरूवात : डॉ. शांतनु गोयल

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – तांत्रिक अडचणींमुळे हडपसर येथील दोन प्रक्रिया प्रकल्प बंद पडल्याने शहरात साठलेला कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे. या दोन्ही प्रकल्पातील दुरूस्ती अंतिम टप्प्यात असून नवीन प्रकल्पही कार्यन्वीत केल्याने येत्या काही दिवसांत कचर्‍याची समस्या कमी होईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. शांतनु गोयल यांनी दिली.

देवाची उरूळी येथील ग्रामस्थांनी शहरातील मिश्र कचरा आणि प्रक्रिया प्रकल्पांवरील रिजेक्ट कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्पामध्ये टाकण्यास विरोध केला आहे. अशातच हडपसर येथील रोकेम आणि दिशा कंपनीच्या वतीने चालविण्यात येणार्‍या दोन प्रकल्पांमध्ये अनुक्रमे आग आणि पावसामुळे तांत्रिक बिघाड झाल्याने मागील काही दिवसांत शहरात कचर्‍याचे ढीग साठू लागले होते. अशातच सलग होणार्‍या दमदार पावसामुळे दुर्घंधी आणि कचरा पावसाळी गटारांमध्ये अडकत असल्याने रस्ते जलमय होत आहेत.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. शांतनु गोयल यांनी सांगितले, की दोन प्रकल्पातील बिघाडामुळे शहरात साठलेल्या कचरा उचलण्यास सुरूवात करण्यात आली आहे. हे दोन्ही प्रकल्प लवकरच कार्यन्वीत केले जातील. यासोबतच शहरातील विविध भागात नव्याने उभारण्यात आलेले तीन प्रकल्प कार्यन्वीत करण्यात आल्याने तेथे प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत या तिन्ही प्रकल्पांची क्षमता वाढविण्यात येईल. तसेच हरित लवादाच्या आदेशानुसार देवाची उरूळी येथील कचरा डेपोमध्ये रिजेक्ट नेण्यास काहीच अडचण नाही. यासंदर्भात ग्रामस्थांना विश्‍वासात घेउन मार्ग काढण्यात येईल.

You might also like