‘नवीन अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा अन् मला ‘रिलीव्ह’ करा, सोनिया गांधींची कार्यकारिणीला सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु झाली असून या बैठकीदरम्यान अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नेतृत्त्व निवडीची प्रक्रिया सुरु करा, अशा सूचना त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीला केल्या आहेत. यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आवाहन केलं.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही बैठक व्हर्च्युअल होत आहे. या बैठकीत सोनिया गांधी यांनी त्यांना अंतरिम अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची भूमिका मांडली. तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारावीत अशी विनंती त्यांनी केली. देशातील 23 बड्या नेत्यांनी पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी केली आहे. या पत्रातून अप्रत्यक्षपणे नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यावर मनमोहन सिंग आणि ए.के. अँटनी यांनी जोरदार टीका केली आहे.

काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी

– राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये नाहक विलंब
– राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही
– सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत
– युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.

काँग्रेस नेत्यांच्या मागण्या

– नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल हवेत
– काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूका व्हाव्यात
– संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी
– पक्षाने गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची
– संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी
– प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी