सर्वांसाठी पुणे-दौंड-बारामती डेमू सुरू करा, प्रवाशांची मागणी

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ३११ दिवसांनी शटल सेवा बंद होती. ती आता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता दौंड- पुणे- दौंड रेल्वे डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डिईएमयू) सेवा प्रजासत्ताक दिनी सुरू झाली आहे. आता ही सेवा पुणे-दौंड-बारामती-पुणे अशी लवकरच सुरू केली पाहिजे. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेतील नाही, तर मुंबईप्रमाणे सर्वांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध असली पाहिजे, अशी मागणी बारामती तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

दौंड रेल्वे स्थानकामध्ये प्रजासत्तादिनी (26 जानेवारी) सकाळी शटल सेवा पुन्हा सुरू झाली. आमदार राहुल कुल, दौंड- पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक एच. एल. मीना आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

दररोज या सेवेच्या चार फेऱ्या होणार आहेत, असे यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या ई- पासधारकांनाच प्रवास करता येणार आहे. दौंड- पुणे दरम्यानच्या पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी कांचन, लोणी काळभोर, मांजरी व हडपसर येथे थांबे आहेत.

पुणे-दौंड-बारामती या प्रवासी मार्गावर २२ मार्च २०२० पासून शटल व डिईएमयू सेवा बंद आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. दौंड आणि बारामती तालुक्यातील अनेक नागरिकांना पुणे शहराकडे यावे लागते. त्यामुळे ही सेवा फक्त दौंडपर्यंत नाही, तर बारामतीपर्यंत सुरू झाली पाहिजे. एस.टी. महामंडळाच्या बसेसना प्रचंड गर्दी असते. एस.टी.चा प्रवास रेल्वेपेक्षा महाग आहे, त्यामुळे ज्येष्ठ, वृद्ध आणि अपंग नागरिकांसह दररोज कामकाजासाठी जाणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता शटल सुरू झाल्याने दैनंदिन प्रवाशांकरिता देखील नियमित शटल, डिईएमयू व पॅसेंजर सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्याची मागणी होत आहे.

ई- पासची प्रक्रिया

ई- पास करिता रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावयाची आहे. पासकरिता कार्यालयाचे पत्र, सचित्र ओळखपत्र, फिटनेस सर्टिफिकेट, छायाचित्रासह माहिती अर्जदाराने ऑनलाइन भरून द्यायची आहे. पुणे पोलिस आयुक्तालयामार्फत प्राप्त अर्जाची पडताळणी केल्यानंतर अर्जदाराला प्रवासासाठीचा क्विक रिस्पॉन्स कोड (क्यूआर कोड) आधारित ई- पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.