आरक्षण लागू होईपर्यंत मराठ्यांसाठी ‘या’ 10 योजना सुरू करा, खा. उदयनराजेंची महाविकास सरकारकडे मागणी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती लागू कराव्यात. जेणेकरून मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्याना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषत: जे विद्यार्थ्यी दुर्गम भागातील आहेत अशा विद्यार्थ्याना इतर समाजाप्रमाणे हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. त्याचप्रमाणे नामांकित शाळेमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मराठा समाजाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने मराठा समाजाला विविध योजना लागू करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली आहे. मराठा समाजाला स्थगिती दिल्यानंतर उदयनराजे यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता 10 मागण्या त्यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.

उदयनराजेंनी केलेल्या या 10 मागण्या
1. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह निर्माण करावे.
2. वसतीगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना ‘स्वयं’ योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा.
3. गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश मिळावा
4. ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत.
5. सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1000 कोटीचा निधी उपलब्ध करुन द्यावा.
6. बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करुन द्याव्या.
7. मराठा समजातील बेरोजगार युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात आर्थिक सवलत लागू करावी.
8. मराठा समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षणाची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करुन द्यावी.
9. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना लागू करावी. शेती व शेतकरी कुटूंबास विमा संरक्षण द्यावे.
10. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन द्यावा.