आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्राबाबत PM मोदींना केली ‘ही’ कळकळीची विनंती, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिध्द उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून पंतप्रधान कार्यालयाकडे लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लसीकरणाची पात्रता वाढवून सर्वांसाठी लसीकरणाला परवानगी द्यावी. तसेच लसीकरण मोहीम वेगाने राबवण्याकरिता यात खासगी क्षेत्रालाही भागीदार करुन घ्यावे असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.

राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनला  विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्र्यांना लॉकडाउन न करण्याचे आवाहन महिंद्रा यांनी केले आहे. महिंद्रा यांनी म्हटले आहे की, उद्धवजी लॉकडाउनचा सर्वात जास्त फटका गरीब, स्थलांतरित कामगार आणि छोट्या उद्योगांना बसतो. यापूर्वी झालेल्या मूळ लॉकडाउनच्या काळात हॉस्पिटल्स आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आपण खर्च केला होता. आता या सुविधा पुनरुज्जीवित करण्यावर आणि मृत्यूदर कमी करण्यावर भर  देवू यात असे महिंद्रा यांनी म्हटले आहे.