लक्षात ठेवा ! 21 जूनला बंद होऊ शकते SBI ची ‘ही’ सुविधा, त्यापूर्वीच राहा तयार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बाब जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गुरुवारी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली की, २१ जून २०२० रोजी त्यांच्या ऑनलाईन सुविधा बंद राहू शकतात. त्यामुळे जर तुम्ही अशा परिस्थितीत ऑनलाइन व्यवहाराबाबत विचार करत असाल तर त्यानुसार योजना करा. काही दिवसांपूर्वीच ग्राहकांना एसबीआयच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर व्यवहार करण्यात समस्या येत होती.

गुरुवारी एसबीआयने आपल्या एका ट्वीटमध्ये लिहिले, ‘बँक आपल्या काही ऍप्लिकेशनसाठी नवीन इन्व्हॉयरमेंट राबवत आहे. त्यामुळे २१ जून रोजी बँकेच्या ऑनलाइन सेवा चालवण्यास समस्या येऊ शकते. आम्ही ग्राहकांना ही गैरसोय टाळण्यासाठी योजना बनवण्याची विनंती करतो.’

यापूर्वी १३ आणि १४ जून रोजी एसबीआयची ऑनलाइन सेवा योग्यरित्या कार्यरत नव्हती, त्यानंतर अनेक ग्राहकांनी एसबीआयकडे याबाबत तक्रार देखील केली होती. ग्राहकांच्या तक्रारीवर एसबीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही उत्तर देण्यात आले. अशा अनेक ट्वीटला उत्तर देताना एसबीआयने सांगितले की, लवकरच त्यांच्या सेवा सुरू होतील.

ऑनलाईन व्यवहार नव्हते करू शकत ग्राहक
एसबीआयच्या एका ग्राहकाने सांगितले की, १३ जूनच्या सकाळपासूनच बँकेच्या सेवा ठप्प झाल्या आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या बँक खात्यातून व्यवहार करण्यास अडचण येत आहे. पेटीएम, यूपीआय, योनो एसबीआय, एसबीआय इंटरनेट बँकिंग इत्यादी माध्यमातून व्यवहार करण्यास सक्षम नसल्याचे इतर बर्‍याच ग्राहकांनी सांगितले होते. ते त्यांच्या खात्यातील शिल्लक देखील तपासू शकत नव्हते.

मात्र काही काळानंतर एसबीआयने ग्राहकांना सांगितले की, त्यांची इंटरनेट बँकिंग सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. परंतु एसबीआय योनो ऍपची सेवा अद्याप बंद आहे. बँकेने ग्राहकांना सांगितले की, सेवा देखरेखीखाली असून लवकरच ती पुन्हा सुरू केली जाईल.