लॉकडाऊनमध्ये SBI नं कोटयावधी ग्राहकांना केलं अलर्ट ! बोगस बँक अधिकार्‍यांपासून रहा ‘सतर्क’, रिकामं होऊ शकतं ‘अकाऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन फसवणूक वेगाने वाढत आहे. म्हणूनच बँका आपल्या ग्राहकांना सतत सतर्क करत आहेत. तसेच आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अलर्ट जारी केला आहे. एसबीआयने आपल्या खातेदारांना बँकेचे अधिकारी बनून अ‍ॅपद्वारे मोबाईल फोन स्क्रीनच्या रिमोट ऍक्सेसद्वारे फसवणूक होण्यापासून सावध केले आहे. सोबतच जर फसवणूकीचा शिकार झाल्यास किंवा अशा कोणत्याही घोटाळ्याची माहिती मिळताच कुठे तक्रार नोंदवायची, हे बँकेने सांगितले आहे.

एसबीआयने ट्विट करत सांगितले की, अशी फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, जे बँक अधिकाऱ्याच्या रूपात तुमच्याशी संपर्क साधतात आणि एका ऍपच्या माध्यमातून तुमच्या मोबाइल फोनच्या स्क्रीनपर्यंत रिमोट ऍक्सेस मिळवून लोकांना फसवतात. जेव्हा तुम्हाला कोणत्याही घोट्याळ्याबद्दल माहिती मिळेल, तेव्हा आम्हाला ईमेलद्वारे सूचना द्या- [email protected] & [email protected]. याशिवाय https://cybercrime.gov.in/Default.aspx यावरही तक्रार नोंदवू शकता.

असे रिकामे होऊ शकते खाते
एसबीआयने सांगितले, फसवे बँक अधिकारी ग्राहकांना कॉल करून म्हणतात की, आपले व्हॅलेट किंवा बँक केवायसी बेकायदेशीर आहे आणि आपले डेबिट कार्ड ब्लॉक आहे. फसवणूक करणारा म्हणतो की, आम्ही तुमची समस्या ऑनलाइन सोडवू. यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाइलमध्ये एक ऍप डाउनलोड करण्याची प्रक्रिया सांगतात. या अ‍ॅपद्वारे घोटाळेबाज तुमची मोबाइल फोन स्क्रीन पाहून आणखी नियंत्रण करू शकतात. याद्वारे कॉलर तुमची माहिती चोरून तुमच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करतात.

पैसे ट्रान्सफर करण्यासाठी ओटीपी आवश्यक असतो जो घोटाळेबाज या ऍपद्वारे तुमच्या मोबाइलवरुन मिळवतो आणि नंतर तुमचे बँक खाते रिकामे करतात.

काय करायचे, काय नाही?
देशातील सर्वात मोठ्या बँकेने आपल्या ग्राहकांना घोटाळेबाजांपासून वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगितल्या आहेत. एसबीआयने म्हटले की, ग्राहकांनी त्यांचा कोणताही वैयक्तिक तपशील फोन कॉल/ ईमेल/ एसएमएस/ वेब लिंकवर देऊ नये. इंटरनेट सर्च इंजिनवर दिलेल्या नंबरवर विश्वास ठेवू नका. फोनमध्ये अनधिकृत मोबाइल अ‍ॅप्स इन्स्टॉल करू नका.
बँकेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी https://bank.sbi/ वर भेट द्या. बँकेचे अधिकृत ऍप जसे YONO SBI, YONO Lite आणि BHIM SBI Pay इत्यादी इन्स्टॉल करा. ग्राहक केवळ कस्टमर केअर टोल फ्री नंबर- 1800 11 2211 किंवा 1800 425 3800 किंवा टोल नंबर- 080-26599990 वर संपर्क साधा.