गृहनिर्माण व बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. राज्य सहकार निवडणूक प्राधिकारणाकडून गृहनिर्माण सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेली मुदत 15 सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यापूर्वीच या निवडणूका पुढे ढकलण्याचे आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात दीड लाखापेक्षा अधिक सहकारी संस्था आहेत. त्यांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाची असते. निवडणूक जाहीर करण्यापासून ते पार पार पडेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्राधिकारणाच्या नियंत्रणाखाली असते. 2019 मध्ये मुदत संपलेल्या 13043 संस्था होत्या. याची निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र मार्चपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भावास सुरुवात झाली व त्यांना मुदतवाढ देण्यात आली.

यानंतर जानेवारी 2020 पासून मागील सहा महिन्यात 31394 संस्थांची मुदत संपली आहे. या संस्थांनाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुदवाढ मिळाली होती. ही मुदत 15 सप्टेंबर रोजी संपत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर प्राधिकरणाकडून या संस्थांच्या निडणूकांना पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. किमान दोन महिने मुदतवाढ दिली जाईल असे दिसत आहे. याला सहकार प्राधिकारणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकाही याच कारणामुळे पुढे ढकलण्यात येणार आहेत. सन 2019 मध्ये 52 व या वर्षातील अशा एकूण 180 समित्यांची मुदत संपली असून त्यांची निवडणूक सध्या प्रलंबित आहे.