राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 12 लाखांचे मद्य जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या शहरात आणलेली गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई रहाटणी येथे केलीआली असून या कारवाईत 14 लाख 44 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. नागेश मारुती सावंत (वय-29 रा. काळाखड, भूमकर चौक, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

वाकड ते नाशिक फाटा दरम्यान गोवा बनावटीच्या दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार रहाटणी येथे वाहनांची तपासणी करत असताना एका वाहनामध्ये गोवा बनावटीचे वेगवेगळ्या ब्रँण्डचे 139 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन 11 लाख 94 हजार 600 रुपयांची दारु आणि गुन्ह्यात वापरलेले 2 लाख 50 हजार रुपयांचे वाहन असा एकूण 14 लाख 46 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महाराष्ट्रात मद्याची किंमत जास्त असल्याने गोवा राज्यातून कमी किंमतीतून मद्य शहरात आणून विक्री होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची करावाई यापुढेही सुरु राहणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अशाच प्रकारची कारवाई नारायणगाव परिसरात करण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, उप अधीक्षख एस.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक व्ही. ओ मनाळे, आर. पी. शेवाळे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com