ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! गणपतीसाठी कोकणात एसटी जाणार, E-Pass ची ही गरज नाही मात्र…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   गणेशोत्सवासाठी कोकणातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यास परवानगी मिळणार की नाही याबाबत मागील अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहीली होती. राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे चाकरमान्यांचे लक्ष लागून राहिले होते. आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी काही नियम पाळावे लागणार आहेत. या नियमांचे पालन करूनच चाकरमान्यांना कोकणात जावं लागणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन मंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत चाकरमान्यांना कोकणात जाण्याच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आता क्वारंटाईनचा कालावधी हा 10 दिवसांचा करण्यात आला आहे. तर सात हजार गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे. बुकिंग प्रमाणे गाड्या सोडल्या जाणार आहेत. मंगळवारी (दि.4) संध्याकाळी 6 वाजल्यापासून तिकीट बुकिंग सुरु होणार आहे.
एसटीमध्ये 22 लोकांना प्रवास करता येणार असून मुंबईहून थेट गावात प्रवासी जातील. प्रवासादरम्यान गाडी कुठेही थांबणार नाही. स्वत:चं जेवण घेऊन प्रवास करायचा आहे. जेवणासाठी एसटी कुठेही थांबणार नाही. फक्त 2 ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी बस थांबवणार आहे. खासगी बस चालकांना एसटी पेक्षा दीडपटच दर आकराता येणार आहे. नाहीतर कारवाई करण्यात येणार आहे.

कोकणवासीयांना 12 ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. 12 तारखेला रात्री 12 पर्यंत पोहचतील ते होम क्वारंटाईन होतील. ज्यांना 12 तारखेनंतर जायचे असेल त्यांनी 48 तासांपूर्वी कोविड 19 चाचणी करावी लागेल ती निगेटिव्ह आली तरच त्यांनी कोकणात जावं असाही नियम करण्यात आला आहे.