ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी 10 हजार कोटींचें पॅकेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या संदर्भात ठाकरे सरकारनं आज एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारनं 10 हजार कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली असून तसा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सवस्तिर माहिती दिली आहे. अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसांमध्ये मदत जाहीर करू असं आश्वासन दिलं होते. ते मुख्यमंत्र्यांनी पुर्ण केलं आहे. दिवाळीपर्यंत ही मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

परतीच्या पावसामुळं राज्यातील शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं. बळीराजाचे अतोनात हाल झाले. विरोधी पक्षाकडून टिकेची झोड उठल्यानंतर प्रत्यक्षात मुख्यमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौर्‍यावर निघाले तर विरोधी पक्षाचे नेत्यांनी देखील बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. नुकसान झाल्याचं पाहून परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं मान्य करण्यात आलं होतं. मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना 2 दिवसाच्या आतमध्ये मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसेच मी करून दाखवणारा मुख्यमंत्री असल्याचं सांगत अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. दिलेलं आश्वासन पुर्ण करत मुख्यमंत्र्यांनी आज अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी 10 हजार केाटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सणासुदीच्या काळात शेतकर्‍यांच्या डोळयात अश्रू येऊ देणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत ही दिवाळीपुर्वीच पोहचवण्यात येईल असं सांगितलं आहे.

You might also like