मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार करणार महत्त्वाची घोषणा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा संघटना आक्रमक झाल्यानंतर आज सरकार कॅबिनेट बैठकीत चर्चा करून महत्वाच्या घोषणा करणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे. शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. यानंतर सरकारने विविध संघटनांकडून उपाय सुचवण्याचं आवाहन केलं होते. यात अनेक सूचना आल्या असून त्यावर कायदेशीर विचार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यात काही महत्वपूर्ण निर्णय करण्यात आले आहेत. त्यामुळे आज मंत्रिमंडळ बैठक आणि त्यानंतर होणारी मंत्री गट बैठकीत हे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. तर यामध्ये नोकर भरती आणि विद्यर्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश यावर घोषणा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुप्रीम कोर्ठाने दिलेली मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्या संदर्भात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या खंडपीठासमोर विनंती अर्ज केला होता अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली. या प्रश्नावर राज्याने एक पाऊल पुढे टाकले असल्याचे देखील चव्हाण यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री या प्रश्नावर लवकरच सविस्तर भूमिका मांडतील असेही त्यांनी म्हटलं होतं.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सोमवारी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झालीत. सरकारने तातडीने कारवाई करत आरक्षणासाठी पावलं टाकावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळातील सहकारी आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या होत्या. सरकारकडे उपलब्ध असलेले पर्याय आणि त्यावर कसं पुढे जायचं याबाबत सरकारने आराखडा तयार केला आहे. या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावून राजकीय एकमत घडवून आणण्याचा प्रयत्नही केला गेला.