राज्य सरकारने समृद्धी महामार्गाद्वारे शेतकऱ्यांची केली फसवणूक

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून सातत्याने दौरे सुरू आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या विजयासाठी शरद पवार यांच्यासारखी ऊर्जा घेऊन कार्यकर्त्यांनी फिरावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी केल.

मुरबाड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस,रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) आणि शेकापच्या कल्याण तालुक्यातील ग्रामीण कार्यकर्त्यांचा टिटवाळा येथे मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयराम मेहेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास कुंभार, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पितांबरे, वसंत दिवाने, रमेश जाधव, पंचायत समितीचे सदस्य भरत गोंधळी, कल्याण बाजार समितीचे संचालक अरुण जाधव, अविश जुआरी, जानू बुटेरे आदी उपस्थित होते. मुरबाड मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रमोद हिंदूराव यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्याचबरोबर आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना सुरुवात झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात शांतारामभाऊ घोलप, पां. शि. देशमुख, सोनुभाऊ बसवंत, ठाकूरभाई शहा, महादू बरोरा यांनी कॉंग्रेस तळागाळात रुजवली. मधल्या काळात गोटीरामभाऊ पवारांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी रुजविण्यात महत्वाचे योगदान दिले. मात्र, आता अनेक नेते-कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला एकसंध राहून प्रत्येक बूथ पिंजून काढला पाहिजे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आपल्याला साथ द्यायला पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गावाच्या कानाकोपऱ्यात पोचून सामान्य ग्रामस्थांपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन प्रमोद हिंदूराव यांनी केले.

बेरोजगारांना रोजगार गेल्या पाच वर्षांत मुरबाड तालुक्यासह कल्याण ग्रामीण परिसराचा विकास झालेला नाही. शिक्षण घेऊन शेकडो तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. आगामी काळात मुरबाडमधील एमआयडीसीत नवीन उद्योग सुरू करण्याबरोबरच आपल्या परिसरातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन प्रमोद हिंदूराव यांनी दिले.

राज्य सरकारने समृद्धी महामार्गाद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक केली. नवी मुंबई एअरपोर्ट तयार करण्याच्यावेळी शेतकरी व भूमिपूत्रांना कोट्यवधींचा भाव दिला गेला. त्याचबरोबर विमानतळ कंपनीत शेतकऱ्यांना भागीदार करुन शेअर्स देण्यात येणार आहेत. मात्र, समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादनात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली, असा आरोप प्रमोद हिंदूराव यांनी केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार यांच्यावरील कारवाईचा तीव्र निषेध राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात सरकारने सूडबुद्धीने केलेल्या कारवाईचा मेळाव्यात तीव्र निषेध करण्यात आला. गेल्या ७० वर्षात कोणत्याही सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली नव्हती. आता केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे, असे नमूद करीत मेळाव्यात तीव्र निषेध करण्यात आला.

Visit : policenama.com