धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या न्यायालयीन प्रक्रियेसह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी (दि. 5) विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिले. तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर आखलेल्या 13 विकास योजनांना भरीव निधी देऊ असेही ते म्हणाले.

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मागील सरकारच्या काळात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेने दिलेला अहवाल न्यायालयात सादर करण्यास तत्कालीन सरकारने उशीर केला. तसेच 2019 मध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन समाजाला विविध विकासाच्या 13 योजनांची घोषणा करून 1 हजार कोटी देण्याचे घोषित केले होते. मात्र त्यातील 1 रुपयाही दिला नाही. हे त्यावेळी सत्तेत असणाऱ्या आमदारांनी सुद्धा सभागृहात मान्य केल्याचे मुंडे म्हणाले. सन 2020-21 या कालावधीत धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेेले 51 कोटी कोविडचे निर्बंध असतानाही काही प्रमाणात वितरित केल्याचेही ते म्हणाले.