निवासी डॉक्टरांसाठी Good News : विद्यावेतनात दरमहा 10 हजार रुपयांची वाढ !

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 12 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्यातील वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयात कार्यरत असणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात दरमहा 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतलाय. सरकारने हा चांगला निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया संघटनांनी व्यक्त केली आहे.

आज मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या वाढते संक्रमण रोखण्यासाठी आणि त्यावर योग्य उपचारासाठी डॉक्टर्स आघाडीवर काम करत आहेत.

या निर्णयाबद्दल महाराष्ट्र निवासी डॉक्टर राज्यव्यापी संघटना म्हणजे सेंट्रल मार्डने आनंद व्यक्त केलाय. संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल वाघ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले.

महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मानधनामध्ये एवढी घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या इतिहासात प्रथमच घेतला आहे, असा उल्लेख करून हा निर्णय घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या प्रश्नात लक्ष घालून तो मार्गी लावला, याबद्दल सेंट्रल मार्डने त्यांचेही विशेष आभार मानले.

या निर्णयामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व अतिविशेष उपचार अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्यावेतनात 1 मे 2020 पासून दरमहा 10 हजार रुपयांची वाढ होणार आहे. यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर 29 कोटी 67 लाख 60 हजार रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

निवासी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी मागील दोन वर्षांपासून केली जात होती. या प्रश्नावरून निवासी डॉक्टरांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. यानंतरही त्यांची मागणी प्रलंबित राहत होती, आजच्या निर्णयामुळे ती पूर्ण झालीय.

सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील मार्चपासून महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टर अग्रभागी राहून रुग्णांना तत्परतेने सेवा देत आहेत. याप्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करून रुग्ण सेवा देणार्‍या निवासी डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन हा निर्णय घेतलाय. तसेच यासाठी निवासी डॉक्टर देगील पात्र आहेत, अशी भावना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलीय.