राज ठाकरेंना दिलेला शब्द पाळला ! महाविकास सरकारनं मार्गी लावला आणखी एक प्रश्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत यासाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळानं अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. संचालक मंडळाच्या या मागणीनंतर राज ठाकरेंनी तात्काळ शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधत सर्व मुद्दे मांडले होते. त्यानंतर 2 दिवसात ग्रंथालय सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ अशी ग्वाही उदय सामंत यांनी राज ठाकरेंना दिली होती. यानंतर राज्य सरकारनं राज ठाकरेंना दिलेला शब्द पुन्हा पाळल्याचं दिसून आलं.

राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत कोरोना काळात लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू उठवला जात आहे. आता राज्य सरकारनं नवीन परिपत्रक जारी केलं आहे. यात उद्यापासून राज्यातील सर्व ग्रंथालये आणि टप्प्याटप्प्यानं मुंबईतील मेट्रो सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसंच कंटेन्मेंट झोन बाहेरील आठवडी बाजार सुद्धा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, राज्य सरकारनं राज्यातील सर्व ग्रंथालये 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु शाळेतील शिक्षक वर्गाला मात्र 50 टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.

ग्रंथालये सुरू करताना सोशल डिस्टेंसिंग आणि कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून याबाबतचे एसओपी जारी करण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.