सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याच्या हालचाली, ‘चेन्नई पॅटर्न’चा घेणार आधार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबईत आता सर्वासाठी लोकल सेवा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी आता तिस-या टप्प्यात चेन्नई पॅटर्नच्या धर्तीवर महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादित वेळेत प्रवास मुभा देण्याबाबतचा प्रस्ताव दिल्याची माहिती राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. तेंव्हापासून मुंबईतील लोकल सेवा बंद होती. त्यानंतर चेन्नई रेल्वेच्या धर्तीवरच तीन टप्प्यात प्रवाशांना मुभा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. यानंतर गर्दी नसलेल्या वेळेत महिलांना प्रवासांना परवानगी दिली. त्यानंतर आता सर्व प्रवाशांसाठी लोकल सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील कार्यालयांच्या वेळेत बदल केलेला नाही. यामुळे मर्यादित वेळेतील लोकल असून नसल्यासारखी असेल. यामुळे लोकलमुभा देऊनही प्रवासाची मूळ समस्या ‘जैसे थे’ राहील. यामुळे अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला. यामुळे सर्वांसाठी लोकल खुली या पर्यायाचा देखील समावेश प्रस्तावात केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमका कोणत्या पर्यायावर शिक्कामोर्तब करतील यावर लोकल प्रवास अवलंबून आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई लोकल प्रवासाचे पर्याय-

1) महिलांना पूर्ण वेळ

2) सामान्य प्रवाशांना गर्दी नसलेली वेळ

3) सर्वांसाठी पूर्ण वेळ

4) रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत सामान्य प्रवाशांना