राज्य शासनाने व्यवसाय अभ्यासक्रमात बदल करु नयेत : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कौशल्य शिक्षण देणाऱ्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमात बदल वा त्याचे अन्य रुपांतर राज्य शासनाने करु नये अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांना पत्र पाठवून केली आहे.

राज्यात १९८९ पासून केंद्र सरकार पुरस्कृत +२ स्तरावरील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरू आहेत. या अंतर्गत राज्यात जवळपास ११०० संस्थांमध्ये एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या ३० वर्षात अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.

शेतमजूर, रोजंदार कामगार, अल्पसंख्यांक, आर्थिक मागास अशा वर्गातील विद्यार्थी यात शिक्षण घेतात. कौशल्य शिक्षण घेऊन कमी वेळात स्वावलंबी होण्याची या विद्यार्थ्यांची मानसिकता असते. तसेच शासनाचा भर व्यवसाय शिक्षणावर आहे. याकरिता उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचे अन्य अभ्यासक्रमात रुपांतर न करता हे अभ्यासक्रम नॅशनल स्कूल्स कॉलिफिकेशन्स फ्रेमवर्क (NSQF) च्या धर्तीवर त्याचे सक्षमीकरण करावे अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली आहे.