पुण्यात ‘अभाविप’चं आंदोलन, महाविद्यालये तात्काळ सुरू करण्याची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये सर्व विद्यापीठे व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु, आता ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत सर्वकाही पूर्वपदावर आले असताना फक्त विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. त्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, राज्य सरकारने आता महाविद्यालये सुरु करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने शहरातील विविध महाविद्यालयांसमोर जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी ABVP कडून करण्यात आला. सामंत यांनी २९ जानेवारीपासून महाविद्यालये सुरु होतील, असे सांगितले होते. मात्र, आजपर्यंत महाविद्यालये सुरु करण्याबद्दल राज्य सरकार गंभीर नाही. त्याच पार्श्वभूमीवर संतप्त झालेले विद्यार्थी आणि ABVP चे कार्यकर्ते विविध महाविद्यालयात धडकले. दरम्यान, स. प. महाविद्यालयात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व ABVP च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.

शैक्षणिक वर्ष संपत आले असून, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अजून प्रॅक्टिकल सुरु झाले नाहीत. ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. महाविद्यालय सुरु करण्याबाबतचे निर्णय हे केवळ विद्यापीठाकडे, स्वायत्त संस्थेकडे असतात, असे असताना सुद्धा राज्य सरकार अशा संस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहत आहे. महाविद्यालये सुरु झाली नाही तर, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होईल, असे सांगत ABVP ने आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली.

याबाबत बोलताना ABVP चे प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे म्हणाले, राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कसलीही काळजी नसून, लाखो महाविद्यालयीन तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचे काम सुरु आहे. राज्य सरकारने सर्व महाविद्यालये २ दिवसांत सुरु करावी, अन्यथा ABVP अधिक तीव्रपणे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.