जे बोलतो ते मी करतो, पण करु शकत नाही, असं बोलत नाही : CM उद्धव ठाकरे

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणार नाही. जे करु शकत नही, ते बोलत नाही आणि जे बोलतो ते करतोच, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी उस्मानाबादमधील (osmanabad) काटगावातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. मी इथे आकडा जाहीर करायला आलेलो नाही, तर तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. या संकटावर आपण नक्की मात करु, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तुमच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्याचं काम याआधीही मी केलं आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो. माझं कर्तव्य शून्य आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. यंदाचं वर्ष, संकटाचं आहे. वर्षाची सुरुवात कोरोना महामारीनं झाली. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळानं हाहाःकार माजवला. आता परतीच्या पावसाने (Rain) प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. आधी कधीही झाला नव्हता इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे अगदी होत्याचं नव्हतं झालं आहे. मात्र आपण या परिस्थितीतूनही सावरू, पण तुम्ही धीर सोडू नका, अशी साद मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना घातली.

राज्य सरकारनं (Government) तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी भाजप (BJP) नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. मी सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करत नाही. आकडे लावण्यात मला रस नाही. मी जे बोलतो, ते करतो. पण जे करु शकत नाही, ते मी बोलत नाही. त्यामुळे मी उगाच घोषणा करणार नाही. मी इथे आकडे जाहीर करायला आलेलो नाही. तर तुमच्याशी संवाद साधायला, तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.