पुणे महापालिकेला झटका ! TDR बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील सहा मिटरचे सर्व रस्ते नऊ मीटर करण्याच्या पालिकेच्या निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती दिली असून मंगळवारी मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पालिकेतील सत्ताधारी भाजपला अजित पवार यांनी झटका दिला असून भविष्यात पालिका काय पवलं उचलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पालिका प्रशासनाने शहरातील सहा मीटरचे 323 रस्ते नऊ मीटर करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. हा प्रस्ताव स्थायी समितीने बहुमताच्या जोरावर मंजूर केला. ठराविक बांधकाम व्यावसायिकांनाच डोळ्यासमोर ठेवून हा प्रस्ताव आणला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने केला होता. सर्वपक्षीय गटनेत्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन याविषयी तक्रार केली होती. त्यावेळी पवार यांनी बहुमताच्या जोरावर चुकीचे निर्णय न घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते.

आदेश देऊन देखील बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या पालिकेतील गटनेते आणि राष्ट्रवादीच्या आमदारांसह गटनेते आणि नगरसेवकांनी या प्रस्तावाला राज्य शासनाने स्थिगिती देण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. या संदर्भात मंगळवारी मंत्रालयात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांबरोबर बैठक घेतली. या बैठकीला नगरविकास खात्याचे दोन्ही प्रधान सचिव, खासदार वंदना चव्हाण, आमदार सुनिल टिंगरे, चेतन तुपे तसेच पालिकेतील गटनेते उपस्थित होते.

महापालिकेला पाच पेक्षा अधिक रस्ते रुंद करण्याचा अधिकार नसल्याच्या मुद्यावर चर्चा झाली. स्थायी समितीत मंजूर झालेला ठराव बेकायदेशीर असल्याच निष्कर्ष काढत या स्थायी समितीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे लेखी आदेश नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी पालिकेला निर्गमित करणार आहेत.