ऑनलाईन वर्गांसाठी राज्य सरकार विद्यार्थ्यांना देणार SmartPhone, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे. अशा स्थितीत जे विद्यार्थी स्मार्टफोन खरेदी करण्यास असमर्थ आहेत आणि यामुळं ते ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकत नाहीत त्यांच्यासाठी राज्य सरकारांनी स्मार्टफोन व योग्य संसाधनं उपलब्ध करून द्यावीत असं सांगण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं आहे.

राजस्थानच्या बांसवाडाचे खा कनकमल कटारा यांनी याबाबत लोकसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नांच्या उत्तरात पोखरियाल म्हणाले, “गरीब विद्यार्थ्यांना डिजिटल सेवा प्रदान करण्यासाठी राज्य सरकारांनी सर्वेंक्षण करून त्यांच्यापर्यंत संसाधनं पोहोचवावीत असं सांगण्यात आलं आहे. डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गंत गरीब विद्यार्थ्यांना संसाधनयुक्त बनवण्यासाठी नवीन शिक्षण धोरणातही राज्य सरकारांची भागिदारी महत्त्वाची आहे.

विद्यार्थ्यांच्या टॅबवर अपलोड केले 300 प्रोग्राम

एनसीईआरटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत एका वृत्तपत्रासोबत बोलताना सांगितलं की, “ई पाठशाळा अ‍ॅपवर एनसीईआरटीची संपूर्ण पाठ्यसामग्री उपलब्ध आहे. सरकारच्या सांगण्यावरून मागील वर्षी एनसीईआरटीनं 300 प्रोग्राम विद्यार्थ्यांच्या टॅबवर ऑफलाईन मोडवर अपलोड केले आहेत.