राज्य GST विभागाकडून 7 बोगस व्यापार्‍यांचा पर्दाफाश, तब्बल 100 कोटींचा महसूल बुडवला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – बोगस फर्मची नोंदणी करून त्याद्वारे खरेदी-विक्री न करता 100 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके सादर करत कर बुडवून शासनाला चुना लावणा-या 7 बोगस व्यापाऱ्यांचा पर्दाफाश राज्य जीएसटी विभागाने केला आहे. औरंगाबाद विभागातील अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईतून ही बाब उघडकीस आली.

इंद्र ट्रेडर्स, पूर्ती कन्स्ट्रक्शन, विधाता मेटल्स, सृष्टी इम्पेक्स, विधी एंटरप्राइजेस, जय गणेश कॉर्पोरेशन, एम. के. एंटरप्राइजेस असे कारवाई करण्यात आलेल्या कंपन्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनसुार, शहरातील इंद्र ट्रेडर्स, पूर्ती कन्स्ट्रक्शन आणि विधाता मेटल्स यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 अन्वये नोंदणी करून जीएसटी आयएन क्रमांक प्राप्त केले आहेत. मात्र, ही नोंदणी करताना खोट्या कागदपत्रांचा वापर करून नोंदणी क्रमांक प्राप्त केल्याचे समोर आले आहे. याच कारवाईदरम्यान सृष्टी इम्पेक्स, विधी एंटरप्राईजेस, जय गणेश कॉर्पोरेशन, एम.के. एंटरप्राइजेस या कंपन्याही खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोंदणी दाखला घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे हे सात व्यापारी कोणत्याही मालाची प्रत्यक्ष खरेदी-विक्री न करता मोठ्या प्रमाणात खोटी बिल स्वीकारून व निर्गमित केल्याचे आढळले आहे.

राज्यात 25 व राज्याबाहेरील 200 पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी अशाच प्रकारच्या मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, तसेच खोटी कागदपत्रे वापरून नोंदणी दाखला घेतल्याचे सत्य समोर आले आहे. त्याद्वारे बोगस देयके निगर्मित केली असल्याची शक्यता राज्य जीएसटीच्या तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यकर सहआयुक्त आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.