खोटा दावा करणार्‍या ‘त्या’ बोगस डॉक्टरावर FIR दाखल, कोरोना काळात प्रतिकारशक्ती वाढविण्याचे देत होते औषध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी शासकीय तसेच वैद्यकीय स्तरावर अथक प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावर अद्याप कोणतीही लस आलेली नाही. त्यामुळे सरकारने अफवा आणि इतर बाबींसंदर्भात अलर्ट रहा, असे आवाहन केले आहे. तसेच कोरोना बरा करण्यासंदर्भात खोटे दावे करणार्‍यांविरूध्द देखील योग्य कारवाई केली जाईल, असाही इशारा सरकारने दिला होता. त्यानुसारच एका बोगस डॉक्टरावर संगमनेर येथे गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही परवानगी नसताना ‘टोनो 16’ या नावाने प्रतिकारशक्ती वाढविण्याचे औषध विक्री सुरू केले. याप्रकरणी कोल्हापूर इथल्या कथित डॉक्टर स्वागत तोडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिलाय. संगमनेर इथल्या एका औषधाच्या दुकानात हे औषध उपलब्ध आहे, अशी जाहिरात सोशल मीडियात केली होती. त्यानुसार हा गुन्हा संगमनेर येथे दाखल केला आहे.

स्वागत तोडकर हे स्वतःला निसर्गोपचार तज्ञ म्हणवून घेत आहेत. त्या नावाखाली रुग्णांना विविध औषधे देतात. तसेच ते समाजमाध्यमातून जाहिरात करतात. कोरोनाबद्दल प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी एक औषध विक्रीसाठी बाजारात आणलेे. जे औषधे जादूटोणा (आक्षेपार्ह जाहिरात) आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी कायद्याचा भंग ठरणारे आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी आरोग्य क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते गणेश बोराडे यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी हि कारवाई केली आहे. कोल्हापूरमध्ये  रिक्षाचालक ते बोगस डॉक्टर असा प्रवास केलेल्या तोडकर याच्याविरुद्ध याअगोदरही कोल्हापुरात कारवाई केली आहे. संगमनेर येथेही बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतरही हे प्रकार सुरू आहेच. अलीकडेच तोडकर याने एका औषधाची जाहिरात केल्याचे आढळून आले. यासंबंधी आलेल्या तक्रारीवरून संगमनेरच्या तालुका आरोग्य अधिकार्‍यांनी घारगाव इथल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना तोडकर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असे सांगितले आहे.

‘जीवन संकेत’ या यू ट्युब चॅनलवर ‘टोनो-16’ या औषधाची जाहिरात केली आहे. डॉ. स्वागत तोडकर याचे हे औषध गुरूदत्त मेडीकल, घारगाव (ता. संगमनेर) येथे उपलब्ध असल्याचे त्यात म्हंटलंय. प्रतिकारशक्ती वाढीसाठी हे औषध उपयुक्त आहे, असा दावा त्यामध्ये केला आहे. हा प्रकार बेकायदा असून त्यामुळे तोडकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमाचा भंग केल्याचा आणि औषध व जादुटोणा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिला आहे.तोडकर याच्याविरुद्ध याअगोदरही संगमनेर पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर म्हणून गुन्हा दाखल झालाय. याशिवाय कोल्हापुरातही त्यांच्याविरुद्ध कारवाई झालीय. आरोग्य विभागाने अनेकदा नोटीसा पाठवूनही हे प्रकार सुरूच आहेत. करोना विषाणूच्या काळात लोकांच्या मनातील भीतीचा गैरवापर करण्याचा प्रकार दिसून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने हा प्रकार गांभीर्याने घेतलाय.

कोल्हापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी तोडकर याचा भांडाफोड झालाय. मूळचा रिक्षाचालक असलेल्या स्वागत तोडकरने कोणतीही वैद्यकीय पदवी घेतलेली नाही. तरीही तो स्वत:च्या नावासमोर डॉक्टर लावतोय. इंटरनेटवरून निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक औषधांचा वापर करून आपली दुकानदारी सुरू केलीय. त्याने ’हसत खेळत आरोग्यविषयक घरगुती उपचार’ या विषयावरील आठ हजार व्याख्याने राज्यभर दिलीत.व्याख्यानांचे व्हिडिओ यू ट्यूबवर टाकून आपल्या व्यवसायाचा ग्राफ वाढवलाय. तोडकर स्वत:च्या नावापुढे एम.डी, एनएलपी, एन. डी, मनोविकार तज्ज्ञ, समाजसेवक अशी डिग्री लावत आहे. कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानाही घातक उपचार करणार्‍या स्वागत तोडकर आणि कोमल पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने मार्च 2017 मध्ये जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिस ठाण्यातून सुटका झाल्यावर तोडकरने न्यू महाद्वार रोड येथे संजीवनी निसर्ग आधार केंद्र सुरू केले. यू ट्यूब आणि सोशल मिडियावर त्याची भाषणे ऐकून राज्यभरातील रुग्ण कोल्हापूरमध्ये येतात. पुणे, संगमनेर इथे त्याने केंद्रे सुरू केली. तेथेही त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत. संगमनेर येथे गुन्हा नोंद होऊनही त्याच्या निसर्ग उपचार केंद्रात गर्दी अधिक होत होती.