IPS अधिकाऱ्याला ‘बडतर्फ’ करण्याचा अधिकार केंद्राला : गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोणत्याही आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. वाधवानप्रकरणी गृहमंत्री जबाबदार असून देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याला प्रत्युत्तर देताना गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली. तसेच भाजप नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून कारवाई करावी असे देशमुख यांनी म्हटले आहे.

अमिताभ गुप्ता यांची अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता सरकार त्यांची चौकशी करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. देशमुख म्हणाले, सध्या राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू आहे. असे असताना वाधवान कुटुंबियांनी मुंबई – खंडाळा – महाबळेश्वर असा प्रवास केला. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 188 अन्वये देशव्यापी लॉकडाऊनमुळे जारी केलेल्या कलम 144 अंतर्गत कोरोना व्हायरस काळात प्रवास करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाधवान यांच्यावर आयपीसी 188,269,270,34 तसेच आपत्कालिन व्यवस्थानच्या सेक्शन 51 बी तसेच कोविड 19 च्या सेक्शन 11 नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. तसेच लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी परवानगी देऊन लॉकडाऊन काळात वाधवान यांन मदत केल्याप्रकरणी गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.