काँग्रेस पुर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, ज्योतिरादित्यांनी सांगितल्या ‘या’ 3 कमतरता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पक्षावर नाराज असलेले काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राजीनामा दिल्यांनतर अखेर आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत ते पक्षात दाखल झाले. जेपी नड्डा यांनी त्यांचे पार्टीमध्ये स्वागत केले. यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, ‘मी जेपी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा आभारी आहे, त्यांनी मला कुटुंबात स्थान दिले.’

सिंधिया पुढे म्हणाले की, माझ्या आयुष्यात 2 गोष्टी होत्या ज्यांनी माझे आयुष्य बदलले. एक, 30 सप्टेंबर 2001 ज्यावेळी मी माझ्या वडिलांना गमावले. आणि दुसरा 10 मार्च 2020 चा जेव्हा मी माझ्या आयुष्यासाठी एक नवीन मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान ते म्हणाले की, काॅंग्रेस पक्ष आता पूर्वीसारखा पक्ष राहिला नाही. ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, आज मध्य प्रदेशात ट्रान्सफर माफिया उद्योग सुरू आहे, राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मला एक नवीन व्यासपीठ देण्याची संधी दिली आहे. सिंधिया म्हणाले, ‘मी विश्वासाने सांगतो कि, त्या पक्षात (काँग्रेस) जनतेच्या सेवेचा हेतू पूर्ण होत नाही, तसेच पक्षाची सद्यस्थिती दर्शविते की जसे पूर्वी होते तसे सध्या नाही.’

सिंधिया म्हणाले की, आज मन दु: खी आणि व्यथित आहे. काॅंग्रेससारखा पक्ष पहिल्यासारखा नसल्याची तीन करणे आहेत. पहिले म्हणजे वास्तविकतेचा नकार, दुसरा म्हणजे नवीन विचारधारा आणि तिसरा म्हणजे नेतृत्वाची ओळख नसणे. 2018 मध्ये मध्य प्रदेशात जेव्हा काॅंग्रेसची सत्ता आली तेव्हा ते एक स्वप्न होते, पण ते तुटले. मध्य प्रदेशातील काॅंग्रेस सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. काॅंग्रेसमध्ये राहून लोकसेवा करता येणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले आहे.

राजमाता सिंधिया यांचा उल्लेख :
ज्योतिरादित्य सिंधिया यांचे स्वागत करताना भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजमाता सिंधिया यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘भारतीय जन संघ आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना आणि विस्तार करण्यात राजमाता सिंधिया यांची मोठी भूमिका होती. आज त्यांचे नातू आमच्या पार्टीत सामील होण्यासाठी आले आहेत. जेपी नड्डा म्हणाले की, ज्योतिरादित्य सिंधिया हे आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो.

मंगळवारी ज्योतिरादित्य सिंधिया यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भेट घेतली. त्यानंतर लवकरच सिंधिया यांनी काॅंग्रेसचा राजीनामा दिला. सिंधियाशिवाय त्यांच्या गटाच्या 19 आमदारांनीही मंगळवारी राजीनामा दिला. त्यात सहा मंत्र्यांचा समावेश होता.